सांगली - सांगलीत स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय अखेर मंजूर झाले आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून या अप्पर तहसील कार्यलयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे सांगलीतील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचे आकारमान मोठे आहे. तसेच यातील गावांची संख्या देखील मोठी आहे. मिरज तालुक्यामध्ये सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका यासह इस्लामपूर मतदार संघातील काही भाग, सांगली व मिरज असे तीन विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत. त्यामुळे तालुक्याच्या सर्व प्रकारच्या महसूली कामाबरोबर इतर कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर असायचा. सांगली शहरासह मिरज तालुक्यातील नागरिकांना आपल्या अनेक शासकीय कामांसाठी मोठी ससेहोलपट करावी लागते. विशेषत: सांगली शहर किंवा त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना शासकीय कामांसांठी मिरजला जाणे गैरसोयीचे होते. सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असून देखील तालुक्याचे ठिकाण मात्र मिरज असा विचित्र प्रकार होता. या पार्श्वभूमीवर सांगलीत स्वतंत्र तालुका करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी होत होती. त्याचबरोबर सांगली शहरामध्ये तहसील कार्यालय मंजूर करावी अशीही मागणी प्रलंबित होती. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर सांगली शहरात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे.
हे ही वाचा - भाजप महिला प्रदेशाध्यक्षा नीता केळकर सांगली मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात !
नवीन अप्पर तहसील कार्यालय व त्याची रचना पुढीलप्रमाणे -
- अप्पर तहसील कार्यालय सांगली यामध्ये एकूण - ५ मंडळे असतील. यामध्ये सांगली- ६ गावे, कुपवाड - ५ गावे, कसबे डिग्रज -६ गावे, कवठे पिरान- ८ गावे व बुधगाव मधील ६ गावांचा समावेश असणार आहे.
- ५ मंडळामध्ये एकूण ३१ महसुली गावांचा समावेश असेल. याचप्रमाणे उर्वरित ७ मंडळे व त्याअंतर्गत ५० महसुली गावे ही मिरज तहसील अंतर्गत येणार आहेत.
- नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयाकरिता एकूण ७ पदे नियमित स्वरुपात मंजूर करण्यात आली आहेत.
- यामध्ये अप्पर तहसीलदार -१, नायब तहसीलदार - १, अव्वल कारकून -१, लिपिक टंकलेखक - ४ यांचा समावेश असेल. यासोबत १ वाहनचालक व १ शिपाई यांच्या सेवा गरजेनुसार बाह्य स्तोत्राद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, हे कार्यलय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सूचना केल्या आहेत. सांगली शहरात मंजूर झालेल्या या अप्पर तहसील कार्यालयामुळे सांगली शहर व आसपासच्या खेड्यांमधील नागरिकांना सोयीचे होणार आहे.
हे ही वाचा - सांगलीत आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या सक्षमीकरणासाठी केली मेगा भरती