मुंबई - मुंबई शहराला दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित शहर समजलं जातं, परंतु आता गुन्हेगारीच्या बाबतीत मुंबई दिल्लीलादेखील मागे टाकेल, अशी चर्चा सुरू झालीय. त्याचं कारण म्हणजे पोलिसांनी मागील वर्षभरात महाराष्ट्रातील गुन्हेगारीची जाहीर केलेली आकडेवारी आहे. या आकडेवारीत मुंबईत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. महाराष्ट्राच्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून निदर्शनास येतंय.
राज्यात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ : पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झालीय. राज्यातील पाच प्रमुख शहरांमध्ये बलात्काराच्या 2 हजार 329 घटना घडल्या आहेत. यामध्ये मुंबई पहिल्या स्थानावर असून, विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारे पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ठाणे शहर तिसऱ्या क्रमांकावर असून, महिलांवरील अत्याचारात उपराजधानी नागपूरचा चौथा क्रमांक लागतो. या आकडेवारीनुसार, महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबई पोलिसांत बलात्काराचे 878 गुन्हे दाखल : जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुंबई शहरात सर्वाधिक 958 मुली, महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद आहे. तेच वर्ष 2023 मध्ये मुंबई पोलिसांत बलात्काराचे 878 गुन्हे दाखल झाले होते. विनयभंगाच्या घटनांमध्येही मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या 439 घटना घडल्यात. विनयभंगाच्या 613 घटनांची नोंद झालीय. बलात्काराच्या 397 घटनांसह ठाणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. उपराजधानी नागपूर चौथ्या क्रमांकावर आहे. नागपुरात बलात्काराचे 297 गुन्हे दाखल झालेत. तिथं विनयभंगाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झालीय.
हेही वाचा-