सांगली - अज्ञात व्यक्तीने हॉटेलातील साहित्यासह शेतातील ऊस जाळल्याची घटना इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरील बावची फाट्या जवळ घडली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कृत्यात हॉटेल चालकासह शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी (२ जानेवारी) मध्यरात्री १ ते पहाटे ४ च्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे.
हेही वाचा - ढगाळ वातावरण पावसाच्या हलकी सरी; द्राक्ष बागायतदार हवालदिल
हॉटेल मैत्री पार्कचे मालक व कामगार नेहमीप्रमाणे शनिवारी (२ जानेवारी) रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून घरी गेले होते. काल सकाळी त्यांना हॉटेल मधील साहित्य पेटवल्याचे निदर्शनास आले. अज्ञाताकडून हॉटेलचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दोन गॅस सिलेंडर गायब करण्यात आले होते. तसेच, हॉटेलातील अन्न खाऊन अज्ञाताने हॉटेलातील सीसीटीव्ही कॅमेरा संच, संगणक, हॉटेलचे साहित्य पेटवले होते. यात अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले. याबाबत हॉटेल मालक प्रदीप यशवंत पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे.
ऊसही पेटवला
हॉटेलच्या पूर्व बाजूस काही अंतरावर असलेल्या चंद्रकांत रकटे यांच्या रसवंतीच्या साहित्याची मोडतोड करून अज्ञाताकडून नुकसान करण्यात आले. रस्त्याच्या उत्तरेला बावची-आष्टा भागातील शेतातील उस फडास अज्ञाताकडून आग लावल्याने यात जगन्नाथ भोसले यांचे २ एकर, सर्जेराव यादव २ एकर, भगवान कोळी दीड एकर, छबुराव कोळी १ एकर, भूपाल भोसले १ एकर, जालिदंर यादव १ एकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मिळून एकूण १२ एकरावर उस जळाला आहे. या परिसरातील विद्युत डीपी बंद करून हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - मिरजमध्ये एकाच दिवशी आठ ठिकाणी घरफोडी