सांगली- राष्ट्रीयत्वाबाबत हिंदू 100 टक्के नपुंसक आणि वांझ आहे, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली आहे. नागरिकत्व विधेयकाला होणाऱ्या विरोधावरून भिडे यांनी ही टीका केली आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध हे देश विघातक असल्याचे देखील भिडे गुरूजी यानी सांगितले आहे.
सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक व राष्ट्रीय नागरिक रजिस्टर विधेयकाला विरोध करणाऱ्या हिंदू समाजाला श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सडकून टीका केली आहे. या विधेयकाला विरोध करणाऱ्या हिंदूंना भिडे गुरुजी यांनी थेट नपुंसक आणि वांझ ठरवले आहे. तसेच हिंदू समाजाच्या रक्तात शेकडो वर्षांपासून कमजोरी आणि स्वार्थ आहे. हिंदू समाजाला आपले कोण मित्र कोण, शत्रू कोण मारक कोण, योग्य काय आहे हे कळत नाही. त्याचबरोबर, स्वार्थाशिवाय हिंदूंना काही कळत नसल्याचे देखील भिडे गुरूजी म्हणाले.
कोणत्याही गोष्टीत पास होण्यासाठी 100 मधून 35 टक्के गुण लागतात. मात्र, नपुंसकत्व आणि वांझतेत 35 टक्के गुण नसतात. त्यामुळे, आपण त्यांना नपुंसक आणि वांझ हा शब्द वापरतो. राष्ट्रीयत्वाबाबत हिंदूंचे पुरुषत्व आणि स्त्रीयत्व तसेच आहे. आणि राष्ट्रीयत्वाबाबत हिंदू समाज 100 टक्के नपुंसक आणि वांझ आहे, अशा शब्दात भिडे गुरुजी यांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला होणाऱ्या विरोधावरून टीका केली. सदर विधेयक देशाच्या कल्याणाचे आहे. मात्र, लोकशाही स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याचा विरोध होत आहे. देश धर्म हा विषय हिंदू समाजाच्या रक्तात नसतो. तसेच जे शिकलेले आणि सुशिक्षित असतात तेच स्वार्थासाठी विरोध करत अप्रचारात आघाडीवर असतात आणि हेच देशात सध्या घडत आहे. हा कायदा आधीच झाला पाहिजे होता आणि केवळ हा कायदा आपल्याच देशात नसून जगाच्या पाठीवर 187 देशात आहे. मग आपल्याच देशात विरोध का, असा सवालही भिडे गुरुजींनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, कायद्याला विरोध करणाऱ्या मुस्लिम समाजाची वृत्ती ही खायचे कणग्याचे आणि गायचे इरल्याचे, या म्हणी प्रमाणे आहे. पण दुर्दैव, जिथे हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्व नाही तिथे मुसलमानांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा बाळगणे हा खुळसटपणा व बौद्धिक अंधपणा आहे. जी लोक विरोध करत आहेत त्याचा राजकीय पक्षांकडून स्वार्थासाठी तळी उचलून धरल्या जात असल्याचे देखील भिडे गुरूजी यांनी सांगितले.
हेही वाचा- 'एनआरसी', 'सीएए' कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान उतरणार रस्त्यावर - संभाजी भिडे