सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करत, आपल्या दुचाकीवरून फिरवल्याप्रकरणाची सांगली राष्ट्रवादी कॉंग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. जतच्या 'त्या' संबंधित नगरसेवकाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांनी अहवाल मागवला असून, नगरसेवक टीमू एडके हे दोषी आढळल्यास त्यांची पक्षातून हक्कलपट्टी करण्यात येणार असल्याचे ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरत आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलने सुरू केले आहे. अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या पुतळ्याचा दहन करून त्यांचा निषेध नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आमदार पडळकर यांच्या विरोधात आक्रमक असल्याचे राज्यभर दिसून येत आहे.असे असताना सांगली जिल्ह्यातल्या एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांने मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करत त्यांना चक्क आपल्या दुचाकीवरून शहरभर फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे.
जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांच्याकडून हा प्रकार घडला आहे. याबाबतची बातमी ईटीव्ही भारतनेही प्रकाशित केली होती. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर सांगली जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू करून त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिलेला असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून त्याचे स्वागत करण्यात आले. त्यांना आपल्या दुचाकीवरून संपूर्ण शहरात फिरवल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी ईटीव्ही भारतने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत जत तालुका अध्यक्षांना नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांची चौकशी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत हा अहवाल तयार होईल. हा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये जर नगरसेवक लक्ष्मण टीमू एडके दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करत, पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असं ईटीव्ही भारतशी बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा टीमू एडके यांच्याबाबत काय अहवाल येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.