सांगली- शहराच्या वैभवात आयर्विन पुलामुळे भर पडली. या ऐतिहासिक पुलाला नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलाच्या निर्मितीमध्ये हातभार लावलेल्या एकमेव जिवंत साक्षीदार असणाऱ्या लक्ष्मीबाई पुजारी आजही या पुलाचे कवित्व मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. 'काही काळजी करू नका अजून 50 वर्षे पुलाला काही होणार नाही', असे भविष्य बिनधास्तपणे वर्तवत आहेत.
'सांगली बहू परिस चांगली' अशी बिरुदावली सांगलीच्या बाबतीत मिरवली जाते. कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी जगात पोहोचली आहे. इथली हळद, द्राक्ष, साहित्य, कुस्ती किंवा राजकारण या सगळ्या गोष्टींना जगात तोड नाही. मात्र, या सर्वांना सधन आणि समृद्ध बनवले ते सांगलीच्या आयर्विन पुलाने.
या पुलाच्या निर्मितीमध्ये अवघ्या 10 वर्ष वयात डोक्यावरून घमेला घेऊन खडी टाकण्याचे काम करून लक्ष्मीबाई काम्मणा पुजारी यांनी योगदान दिले होते. आता त्यांनीही वयाची शंभरी पार केली आहे. लक्ष्मीबाई या आयर्विन पुलाच्या बांधकामासाठी कर्नाटकतील जामखंडी तालुक्यामध्ये तोदलबगी येथून सांगलीत पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे 10 वर्ष होते. आणि आपल्या कुटुंबासह लक्ष्मीबाई पुलाच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करत होत्या. खडी टाकण्यापासून माती टाकण्यापर्यंत लक्ष्मीबाई आपल्या कुटुंबासमवेत राबायच्या. या ठिकाणी जवळपास 1 हजारहून अधिक लोक काम करत असत. ज्यामध्ये अवघ्या 5 वर्षाच्या मुलांपासून वयोवृद्धांचाही समावेश होता. 3 वर्षाच्या कालखंडात ह्या पुलाच्य़ा बांधकामाचे काम पूर्ण झाले. या पुलावरून पहिली गाडी गेली, ती म्हणजे बैलगाडी. त्यांनतर घोडागाडी, मग सायकल असा प्रवास पुलावर उद्घाटनानंतर सुरू झाल्याचे त्या सांगतात. वयाची शंभरी पार करूनही लक्ष्मीबाई यांची स्मृती उत्तम असून त्यावेळी कशा पध्दतीने काम करण्यात आले याचा अनुभव त्या अगदी स्पष्टपणे सांगतात.
१९२९ आधी सांगली शहराला पुणे मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता. कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता. नदीच्या पलीकडून जायचे झाले तर नावेतून जीव धोक्यात घालून जावे लागे. त्यामुळे बहुतांश प्रवास हा कोल्हापूर मार्गे होत असे. मात्र, कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला 1914 मध्ये महापुराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरवात झाली ती १४ फेब्रुवारी १९२७मध्ये. ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी, याचे सर्व श्रेय आणि नियंत्रण हे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होते. तर या पुलाच्या बांधकामाचे कंत्राटाचे काम पुण्यातील रानडे कंपनीला देण्यात आले होते.
पुलाला आयर्विन नाव कसे पडले ?
या पुलाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड ज्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती. या पदवीवरून सांगली संस्थानाकडून या पुलाला आयर्विन हे नाव देण्यात आले.
आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. ९० वर्षांच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितांतरे पहिली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक महापूर पचवले आहेत. नुकत्याच आलेल्या भयानक महापुरात या पुलाची थोडी वाताहत झाली आहे. परंतु, तरीही आज पूल मोठ्या दिमाखाने उभा आहे. हा ऐतिहासिक पूल आणि पुलाच्या उभारणीत हातभार लागलेल्या लक्ष्मीबाई पुजारी, हे दोघेही एकमेकांची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे..