सांगली - सांगली शहरातील कृष्णानदीवरील असणारा ऐतिहासिक बंधारा पाडण्याचा घेण्यात येणाऱ्या निर्णयाला सांगलीकरांनी विरोध दर्शवित थेट कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर मानवी साखळी करत बंधारा बचावसाठी आंदोलन केले आहे. जलसंपदा विभागाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाच्या विरोधासाठी भाजपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे "बंधारा बचाव"आंदोलन करण्यात आले आहे.
बंधारा बचावसाठी सांगलीकरांची मानवी साखळी - सांगली शहरातील कृष्णा नदीवरील 89 वर्षाचा ऐतिहासिक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात येत आहे. हा बंधारा पाडून म्हैसाळ या ठिकाणी मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे. मात्र, याला सांगलीकरांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि सांगली शहरातील सामजिक संघटना तसेच सांगलीकर बंधारा बचावासाठी पुढे आल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनी थेट कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर मानवी साखळी करत बंधारा बचावसाठी आंदोलन करण्यात आले. भाजप नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राष्ट्रीगीत म्हणत सांगली शहरासाठी आणि कृष्णा काठासाठी जीवनदायिनी असणारा बंधारा पडू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
बंधारा पाडल्यास अनेक समस्या निर्माण होणार - याबाबत भाजपा नेते पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगली शहरातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा शहरासाठी नव्हे तर कृष्णाकाठच्या अनेक गावांच्यासाठी जीवनदायनी आहे. बंधाऱ्यामुळे सांगलीकर नागरिकांना आणि आसपासच्या गावांना स्वच्छ पाणी मिळत आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. मात्र, हा बंधारा पाडल्यास सुमारे 8 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. बंधारा पाडून म्हैसाळ येथे बांधण्यात येणाऱ्या मोठ्या बंधाऱ्यामुळे अनेक गाव बाधित होण्याबरोबर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शिवाय मौजे डिग्रजपासून म्हैसाळपर्यंत मोठा डोह निर्माण होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळून, पूर्ण कृष्णा नदी प्रदूषत होणार आहे. त्यामुळे सांगली शहराला जीवनदायनी असणारा बंधारा पाडू नये, तसेच बंधारा बचावसाठी येत्या काळात बाधित होणाऱ्या कृष्णाकाठच्या सर्व गावांना एकत्र करून हरिपूरच्या संगमावरून पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - GST on turmeric canceled : हळद उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, हळदीवरील जीएसटी अखेर रद्द