सांगली- गोंधळ घालणाऱ्यांना हटल्याच्या रागात एका हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी इस्लामपूरमध्ये घडली. या प्रकरणी तीन सराईत गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पुजारी, विकास पवार, बिरु मोठे अशी गुन्हेगारांची नावे आहेत.
तलवार काढत जीवे मारण्याची धमकी-
सांगलीच्या इस्लामपूरमधील एमआयडीसी परिसरात अमोल पाटील यांचे हॉटेल आणि परमीट रुम आहे. 8जानेवारीला रात्री ९.३० च्या सुमारास हे तिघे पाटील यांच्या हॉटेलवर दारु पिण्यासाठी आले होते. दारु चढल्यानंतर या तिघांनी तिथे आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अमोल यांनी त्या तिघांना गोंधळ घालू नका असे म्हणत त्यांना हटकले. मात्र, संतापलेल्या तिघांनी काचेच्या बाटल्या फोडत अमोल यांना शिविगाळ केली. एवढचं नाही तर मोटारसायकलला लावलेली तलवार काढत अमोल यांना दमदाटीही केली. त्यानंतर त्यांच्या काऊंटरमधील २४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आणि दर महिना २ हजार रुपये खंडणी नाही दिली तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर अमोल यांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून तिघा सराईत गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.