सांगली - महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्या देण्यात येणार आहेत. या गोळ्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर शनिवारी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते महापालिका प्रशासनाकडे सुमारे १०० गोळ्यांचे बॉक्स सुपूर्द करण्यात आले.
सांगलीतील गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालय आणि पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन यांच्याकडून आज सांगली महापालिकेला आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या देण्यात आल्या आहेत. महापौर गीता सुतार आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे या गोळ्यांचे बॉक्स प्रदान करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
प्रभागनिहाय नागरिक व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या गोळ्यांचे वाटप नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी कृषी राज्यमंत्री यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थितीचा आढावासुद्धा घेतला. कोरोनाच्या या स्थितीत सर्व खबरदारी घ्यावी आणि राज्य सरकारकडून जी मदत हवी असेल ती सर्व केली जाईल, असे आश्वासन विश्वजित कदम यांनी दिले. सोबतच,कोरोनाबाबत योग्य काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी नगरसेवक आणि पालिका प्रशासनाला दिल्या.