सांगली - विजयादशमी (दसरा) म्हणजे आनंदोत्सव. दसऱ्याला होणारी कोकणातील दशावतारी, म्हैसूरची ऐतिहासिक मिरवणूक जशी प्रसिध्द आहे. तशीच येथील विटा शहरात होणारी पालखी शर्यत सोहळा आणि विजयादशमी यांचे नाते अतूट आहे. 150 वर्षांची मोठी परंपरा असणारा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते. विट्याचा रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये ही शर्यत झाली. मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली.
हेही वाचा- दसरा मेळावा! शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का?
भारतीय माणूस मुळातच उत्सव व परंपराप्रिय आहे. परंपरा हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना तो अतिशय जीवापाड जपत असतो. त्या परंपरांचा वारसा पुढील पिढीस सोपवत असतो. नवी पिढीही त्या परंपरा त्याच आपुलकीने स्विकारत असते. अशीच परंपरा विटावासियांनी सामाजिक सलोखा जपत अविरतपणे जपली आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही अत्यंत चित्तथरारक, रोमहर्षक असा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विट्याचा रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये ही शर्यत झाली. मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत शर्यतीत बाजी मारली. यावेळी भाविकांनी केलेल्या रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलंच्या गजराने सुवर्णनगरी दुमदुमून गेली होती. या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित होते.
हेही वाचा- सरसंघचालक मोहन भागवत म्हणतायेत... देशात मंदी नाही
मूळस्थान व विटा येथील दोन्ही पालख्यांची सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर आरती झाली. त्यानंतर काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालख्या आल्या. पाहुणी असल्याने मूळस्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान प्रथेप्रमाणे दिला गेला. दोन्ही पालख्यांची काळेश्वर मंदिरासमोर पुन्हा आरती झाल्यानंतर शर्यत सोहळ्यास सुरवात झाली. आरती झाल्यानंतर विट्याची पालखी व मूळस्थानची पालखी पळवण्यासाठी खांदेकरी कसोशीने प्रयत्न करत होते. सुरवातीपासून विट्याची पालखी पुढे होती. परंतु, निर्णायक क्षणी मुळस्थानच्या पालखीने आघाडी घेत शिलगण मैदानात प्रथम पालखी पोहचली.
त्यानंतर शिलंगण मैदानात आपट्याच्या पानांचे पूजन करुन सीमोउल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. नागरिकांनी एकमेकांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. पूर्वांपार चालत आलेली ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा परंपरेप्रमाणे यावर्षीही मोठ्या भक्तीभाव व जातीय सलोखा राखून पालखी शर्यत सोहळा उत्साहात पार पडला. या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह देशातून लाखो भाविक आवर्जून उपस्थित होते.