जत - तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रविवारी तर दुष्काळी जत तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच इतर भागातही जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. उमदी मंडळ वगळता तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे जत पूर्व भागाला वरदान असणारा संख मध्यम प्रकल्प पंधरा वर्षानंतर भरला आहे. दोडनाला वगळता तालुक्यातील सर्वच तलाव तुंबून भरले आहेत.
जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाल्यानंतर परतीच्या पावसानेही चांगली सलामी दिली. शनिवारी आणि रविवारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर जत मंडळमध्ये 137 मिमी पाऊस झाला, तर शेगाव 29 मिमी , कुंभारी 40 मिमी, उमदी 0 मिमी , मुचंडी 34 मिमी, माडग्याळ 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, वीज पडून बेवनूर येथे एका वृद्धाचा मृत्यु झाला. तसेच अचकनहळीत दोन बैल पाण्यात वाहून गेले. तर कवठ्याच्या अग्रणी नदीत जतचा एक तरुण वाहून गेला. तर आठ जण यातून वाचले आहेत. या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्वारीचीही पेरणी लांबनीवर पडण्याची शक्यता आहे.
जत तालुक्यात गेल्या महिन्यात सहा तलाव कोरडे होते. पण आता चालू महिन्याच्या पंधरवड्यात जवळपास सर्वच तलाव भरले आहेत. जत पूर्व भागातील भिवर्गी, तिकोंडी, मोठेवाडी, सिद्धनाथ या तलावासह नदीपात्रातील बंधाऱ्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकातील तुबची योजनेच्या पावसाळी आवरणातून पाणी आणण्यासाठी मोठा जोर लावला होता. या योजनेतून या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्या पाठोपाठ परतीचा दमदार पाऊस झाल्याने आता या भागातील जवळपास सर्वच तलाव भरले आहेत.
तसेच तालुक्याच्या दक्षिण,उत्तर पश्चिम भागातील बिरनाळ, शेगाव, बिळूर, खोजनवाडी कोळीगीरी, प्रतापूर आधी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शनिवार, रविवारच्या पावसाने या तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. तर तालुक्यात थोडे छोटे पाझर तलाव सुध्दा भरून वाहत आहेत.
संख मध्यम प्रकल्प भरला
जत पूर्व भागाला वरदान असणारा संख मध्यम प्रकल्प पंधरा वर्षानंतर 95 टक्के भरला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत संखच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. या तलावाला जोडणारे ओढे बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे या भागातील पुढील वर्षभराची टंचाई संपुष्टात येणार आहे. जतच्या काही भागातील गावात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे या भागासाठी फायदेशीर असणारा दोडनाला तलावात अजून पाणी नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
रविवारी रात्री तालुक्यातील बेवनूर येथील बाजीराव नारायण शिंदे वय 60 हे शेतकरी जनावरे चारण्यासाठी गावाजवळच्या माळरानावर गेले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना अचानक विजांचा कडकडाट होऊन पाऊस सुरू झाला. यावेळी शिंदे यांचा अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी शिंदे बचावले परंतु ते गंभीर जखमी झाले आहेत.