सांगली - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात 165 मिलीमीटर पाऊस याठिकाणी पडला आहे. त्यामुळे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 4 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून वारणा नदीत होत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने वारणा काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पाऊसाची संततधार सुरू आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे चांदोली धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. 34 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 28.12 टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे आणि धरण 81 टक्के भरले आहे. तर पावसाचा जोर कायम आहे.
गेल्या 24 तासात याठिकाणी 165 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. 4, 400 इतका पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत आहे, अशी माहिती वारणा पाटबंधारे शाखाधिकारी टी. एस. धामणकर यांनी दिली आहे. गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. तर वारणा नदीवरील काखे-मांगले पूल आणि 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शिराळ्याच्या कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार, असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.