सांगली- जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कायम आहे. या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु, गेल्या कित्येक दिवसापासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाने हजेरी लावली आहे. तर, आज शहरात संततधार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच रिमझीम आणि जोरदार स्वरूपात पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील जनजीवनावर परीणाम झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या पश्चिम भाग असणाऱ्या शिराळा तालुक्यातही पाऊसाचा जोर वाढला आहे. तर अत्यल्प पाणी साठा शिल्लक असलेल्या चांदोली धरण परीसरात गेल्या दोन दिवसापासुन मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात धरण परिसरात ७० मीलीमिटर इतक्या पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.
धरण परिसरात आज अखेर २४९ मीलीमिटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, दोन दिवसापासुन पडणाऱ्या या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. सध्या धरणात १.१५ टि.एम.सी पाणीसाठा शिल्लक आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या या पावसामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.