सांगली - शहर आणि परिसरात सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला आहे. अचानक पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या खरीप पेरणीवर त्याचा परिणाम झाला होता. त्याचबरोबर सांगली शहरात मोठ्या प्रमाणात उकाड्याने सांगलीकर हैराण झाले होते.
हवामान खात्याकडून 28 ते 30 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तरीही तीन दिवसात समाधानकारक असा पाऊस झालाच नाही. आज सायंकाळच्या सुमारास पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे सांगली शहराबरोबरच आसपासच्या परिसरात या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकरी वर्गातही या पावसाच्या हजेरीमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.