सांगली - यकृत रवाना करण्यासाठी सांगली शहरात ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते. अवघ्या 4 मिनिटात शहरातून पुण्याकडे एका महिलेचे यकृत रवाना झाले. सांगली पोलिसांच्या आवाहनाला सांगलीकर नागरिकांनी प्रतिसाद देत यशस्वीरित्या ग्रीन कॉरिडॉर पार पाडले. पहिल्यांदाच सांगलीकरांना ग्रीन कॉरिडॉर पाहता आला.
हेही वाचा - 'कोल्हापूरकरांनो, लक्षात ठेवा तुमचा फोन यमालाही लागू शकतो'
एका ब्रेन डेड झालेल्या महिलेचे यकृत पुण्याला रवाना करण्यात येत असल्याने सांगलीत पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर करून हे यकृत पुण्याला रवाना करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील दाणोळी येथील ललिता पाटील यांचा सांगलीतील भारती रुग्णालयात मृत्यू झाला. ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ अवयव दानाचा निर्णय घेतला. यावेळी भारती रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने पुण्याच्या डीवाय पाटील रुग्णालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
यानंतर डीवाय पाटील रुग्णालयाची वैद्यकीय टीम तातडीने सांगलीच्या भारती रुग्णालयात दाखल झाली. यावेळी सकाळपासून महिलेचे अवयव काढण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा - महात्मा फुले कर्ज माफीसाठी राज्य सरकारवर 30 हजार कोटींचा बोजा
सांगली पोलिसांकडून शहरात ग्रीन कॉरिडॉर घोषित करण्यात आला. त्यानंतर दुपारी हे यकृत ग्रीन कॉरिडॉर करत पुण्यासाठी निघाले. यावेळी पोलिसांनी भारती रुग्णालयापासून सांगली शहराच्या बाहेर अवघ्या 4 मिनिटात ग्रीन कॉरिडॉर करत यकृत घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रवाना करून दिले.
सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष 7 अधिकारी आणि 63 पोलिसांचा बंदोबस्त या मार्गावर तैनात करण्यात आला होता. तसेच सांगलीत पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर असल्याने हे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा झाली होती.