सांगली - द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा बदडून काढू असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यापारी आणि अडत दुकारनदारांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी वरील वक्तव्य केले.
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि बेदाणाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, द्राक्ष आणि बेदाण्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गेल्या काही वर्षात लूट होत आहे. अडत, व्यापारी आणि दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे खराडे म्हणाले.
२१ दिवसांच्या आत, द्राक्ष, बेदाण्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावेत. मार्केट कमिटीकडे नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच खरेदी-विक्रीमध्ये सहभागी करून घ्यावे, ५०० ग्रॅमची तूट पकडू नये, बॉक्सचे पैसे द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जे व्यापारी, अडते द्राक्ष उत्पादकांचे शोषण करतील त्यांना बदडुन काढू, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.