सांगली - राज्यपालांनी अतिवृष्टीबाधित शेतकाऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचे मत भाजपचे खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांची भेट घेऊन राष्ट्रपतींकडेदेखील पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल(16 नोव्हेंबर) मदत जाहीर केली आहे. खरीप पीकांसाठी 8 हजार रूपये प्रति हेक्टर तर, फळबागांसाठी 18 हजार रूपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना मदतीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्यास राज्यपालांची टाळाटाळ
असे असतानाच सांगलीचे खासदार संजय पाटील यांनीही राज्यपालांच्या या मदतीवर नाराजी जाहीर करून भाजपला घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी यासाठी आपण देशाच्या कृषी मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.