सांगली - चक्क खोटं लग्न लावून एका नवरदेवाची फसवणूक केल्याचा अजब प्रकार विटा येथे घडला आहे. लग्नासाठी नवरदेवाकडून दोन लाखांच्या रोकडसह 3 लाखांचा मुद्देमाल उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सिनेस्टाईल नववधूने धूम ठोकत फसवणूक झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कराडच्या नवरदेवाने विटा पोलिसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लग्नासाठी नवरदेवाला द्यावा लागतोय हुंडा...!
लग्नात मुलीच्या नातेवाईकांना हुंडा देण्याची एक परंपरा होती. आता ही परंपरा जरी कायद्याने बंद झाली, असली तरी कुठे ना, कुठे हुंडाबळीचे प्रकार पाहायला मिळतात. पण यापेक्षा एक अजब प्रकार अलीकडे पाहायला मिळत आहे. तो म्हणजे नवरदेवाला लग्नासाठी मुलीच्या नातेवाईकांना हुंडा द्यायचा. कदाचित यावर आपला विश्वास बसणार नाही. पण असे प्रकार पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. लग्न लावायचं पैसे उकळायचे आणि दुसऱ्या दिवशी नवरी गायब असे प्रकार वाढत आहेत. अगदी सिनेस्टाईल पद्धतीने हे सर्व प्रकार होताना पहायला मिळत आहेत.
कराडच्या नवरदेवाचा खोटा विवाह -
असाच एक प्रकार विटा याठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. गणेश बबन कुंभार (रा. कराड) येथील नवरदेवाची फसवणूक झाली आहे. खोटे लग्न लावून त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने उकळून नवरीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पीडित नवरदेवाने विटा पोलीस ठाणे गाठत "स्वाती" नामक नववधूसह तिच्या कथित पाच नातेवाईकांच्या विरोधात खोटे लग्न लावून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
'यादी पे शादी' लावून उकळले पैसे आण दागिने -
सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये राहणारा गणेश कुंभार (वय 41) याचा 28 डिसेंबर 2021 रोजी स्वाती नामक तरुणीशी विवाह संपन्न झाला होता. खानापूरच्या सुलतानगादे येथील वर्षा जाधव यांच्या घरी ही 'यादी पे शादी" मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडली होती. या लग्नासाठी गणेश कुंभारकडून रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने, साडेतीन भाराचे चांदीचे दागिने लग्नाच्या वेळी घेण्यात आले होते.
कपडे घेण्याच्या बहाण्याने वधूचा पोबारा -
लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेश कुंभार आणि त्याची नववधु स्वाती देवदर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या ज्योतिबा येथे देवदर्शनासाठी गेले. त्यानंतर गणेश आणि स्वाती हे दोघेही कराड या ठिकाणी परतले. परतल्यानंतर स्वाती हिने गणेशला आपल्याला ड्रेस हवा आहे, अशी मागणी केली. त्यामुळे कपड्याच्या दुकानात हे नवं जोडपं गेलं. कपड्यांची खरेदीही झाली. मग गणेश कुंभार हा कपड्यांचे पैसे देण्यासाठी काऊंटरवर गेला. तेवढ्यात नववधू स्वाती हिने त्याठिकाणाहून धूम ठोकली. त्यानंतर गणेश कुंभार यांनी आपल्या पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केले. त्याने सुलतानगादे याठिकाणी चौकशीही केले, पण काही पत्ता लागला नाही. काही दिवसांनी गणेश याने आपल्या बहिणीला सुलतानगादे येथील वर्षा जाधव यांच्या घरी चौकशी करण्यासाठी पाठवले असता वर्षा जाधव यांनी गणेश कुंभार यांच्या बहिणीला पुन्हा चौकशीसाठी आल्यास पाय तोडू, अशी धमकी देण्यात आली.
नववधूसह पाच जणांच्या विरोधात गुन्हे -
या सर्व प्रकारानंतर गणेश कुंभार याला आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर गणेश कुंभार याने विटा पोलीस ठाणे गाठत वर्षा बजरंग जाधव (सुलतानगादे, ता. खानापूर), हिंदुराव पवार (आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा), स्वाती, सरीता प्रदिप पवार आणि दशरथ शिंदे या पाच जणांच्या विरोधात खोटे लग्न लावून पैसे व दागिने घेत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत टोळीच्या शोधासाठी विटा पोलिसांकडून पथक नेमण्यात आले असून या टोळीकडून यापूर्वी काही अशा पध्दतीचे गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास विट्याचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव करीत आहेत.