सांगली - ब्रिटिशांना धडकी भरवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रति सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन, स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ लाड यांचे निधन झाले आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी कॅप्टन रामभाऊ लाड यांनी कुंडला या आपल्या गावी शेवटचा श्वास घेतला. तुफान सेनेचे कॅप्टन आणि पत्री सरकारच्या शेवटचा तारा रामभाऊ लाड यांच्या रूपाने निखळला आहे.
- तुफान सेनेचा कॅप्टन हरपला
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्या प्रतिसरकारच्या 'तुफान सेने'चे कॅप्टन रामभाऊ लाड यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाला आहे. पलूस तालुक्यातल्या कुंडल या गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कुंडल हे रामभाऊ लाड यांचे जन्मगाव. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या "प्रति सरकार"च्या चळवळीतील एक महत्त्वाची शिलेदार होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या 'तुफान सेने'चे कॅप्टन म्हणून रामभाऊ लाड हे नेतृत्व करत 1942 ते 46 च्या दरम्यान तुफान सेनेने इंग्रज सरकारला धडके भरवण्याचं काम केले. या सेनेचा कॅप्टन म्हणून रामभाऊ लाड यांनी सर्व धुरा सांभाळली होती. इंग्रजांचा खजाना लुटने किंवा रेल्वे, पोस्ट सेवा यांच्यावर हल्ला करून ब्रिटिश सरकारला नामोहरम करण्याचे काम तुफान सेनेच्या वतीने करण्यात येत होते.
- तुफान सेनेची ब्रिटीश सरकारला धडकी
प्रति सरकारच्या माध्यमातून "तुफान सेने"चे काम हे गावागावात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्याचे होते. तुफान सेनेची दहशत हे गाव गुंडपासून ब्रिटिश सरकारवर मोठ्या प्रमाणात होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व कॅप्टन म्हणून रामभाऊ लाड करत राहिले. लाड यांच्या एका हाकेवर गावा-गावाततले तरुण स्वातंत्र्य लढ्यात नेहमीच सहभागी होत होते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. अत्यंत धाडशी स्वतंत्र सैनिक म्हणून रामभाऊ लाड यांची ओळख होती. कॅप्टन म्हणून पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख होती.
- कुस्तीवर निस्सीम प्रेम
रामभाऊ लाड हे कुस्तीप्रेमी देखील होते. कुंडलमधील कुस्ती मैदान असो किंवा अन्य ठिकाणी कुस्ती मैदान, रामभाऊ लाड हे कुस्ती मैदानात समालोचक म्हणून देखील काम करत होते. त्यांचा भारदस्त आवाज हा कुस्तीप्रेमी आणि कुस्तीगिरांना नेहमीच प्रेरणा देत होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही रामभाऊ लाड यांनी समाजकारण करण्यामध्ये आपले आयुष्य वेचले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील कॅप्टन रामभाऊ लाड यांचा मोलाचा सहभाग राहिला. इयत्ता दुसरी शिक्षण झालेले रामभाऊ लाड यांनी 'असे आम्ही लढलो' आणि 'प्रति सरकारचा रोमहर्षक रणसंग्राम' ही दोन पुस्तके त्यांनी लिहली.
- क्रांतिसिंहाच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला घेतले निरोप
22 जून 2021 रोजी कॅप्टन रामभाऊ लाड यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. या शंभराव्या वर्षाचा वाढदिवसाचा सोहळा देखील कुंडल गावांमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला होता. विशेष बाब म्हणजे 6 फेब्रुवारी क्रांतिसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी असून त्याच्या पूर्वसंध्येला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून ओळख असलेले कॅप्टन रामभाऊ लाड यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.