सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे. या स्थितीत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे मोठी अडचण निर्माण झाली होती. सांगली जिल्ह्यातील सर्व गोरगरीब रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. तसेच मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जवळपास ३०० पेक्षा अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे जिल्हा शासकीय रुग्णालयात आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष व नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोफत अन्नदान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
दररोज २ वेळचे जेवण याठिकाणी सर्वांना देण्यात येत आहे. त्यामुळे येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत याठिकाणी जेवण पुरवण्यात येणार असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे. तर, चव्हाण यांच्या सामजिक बांधिलकीच्या या उपक्रमाची पाहणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी नुकतीच केली होती. अशा या संकट काळात गोरगरीब जनतेची करण्यात येणारी सेवा कौतुकास्पद असल्याचे मत मंत्री कदम यांनी व्यक्त केले होते.