सांगली - एचआयव्ही औषध विक्री व्यवसायाच्या नावाखाली 24 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार मिरज मध्ये उघडकीस आला आहे. नाशिक येथील एकाची मिरज येथे असणाऱ्या मित्राकडून हा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकरणी कुलदीप श्रीवास्तव या व्यक्तीच्या विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ओळखीतून मैत्री आणि सुरू केला व्यवसाय -
मिरज येथे राहणारे कुलदीप श्रीवास्तव आणि नाशिक येथील विपुल पोकळे या दोघांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी ओळखीतून मैत्री झाली होती. कुलदीप श्रीवास्तव हे शासकीय रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करत होते, तर विपुल पोकळे हे शासकीय सेवेत अधिकारी म्हणून होते. दोघांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यातील कुलदीप श्रीवास्तव यांनी पोकळे यांना एचआयव्ही औषध विक्री व्यवसाय करण्याबाबत सुचवले, पोकळे यांना यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. मुंबई मधून एचआयव्ही औषध आणून मिरजेत कुलदीप श्रीवास्तव हे आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना विक्री करणार, यातून मिळेल तो नफा दोघांनी वाटून घ्यायचे असे ठरले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
औषध व्यवसायासाठी दिले 24 लाख -
या व्यवसायासाठी पोकळे यांनी 20 मे 2020 ते 2 एप्रिल 2021 या कालावधीत वेळोवेळी कुलदीप यांना 24 लाख 70 हजार रुपये दिले. मात्र कुलदीप यांनी पोकळे यांना दिलेली रक्कम आणि नफा ही दिला नाही. पैश्याचा मागणी केली असता कुलदीप यांच्या टोलवाटोलवी सुरू होती, त्यामुळे शनिवारी पोकळे यांनी थेट मिरजेत पोहचत कुलदीप श्रीवास्तव राहत असलेले घर गाठले. मात्र ते भाड्याचे आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी सोडून गेल्याचे घर मालकांकडून सांगण्यात आले. कुलदीप श्रीवास्तव हा मूळचा लखनऊ येथील रहिवाशी आहेत. त्याच्याकडून फसवणूक झाल्याची बाबसमोर आली. त्यानंतर त्यांनी मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात कुलदीप श्रीवास्तव याच्या विरोधात 24 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.