सांगली - आज सगळ्याच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, कोणत्याही क्षेत्रात आता महिलांच्या कर्तृत्वाचा ठसा न उमटता राहिला नाही, आणि याचे उदाहरण सध्या सांगली मध्ये पाहायला मिळत आहे. कारण चार-चौघींनी मिळून गाड्या धुण्याचे सर्व्हिसिंग सेंटर सुरू केले आहे. पुरुषी मक्तेदारी मोडून काढत सांगलीच्या चौघीजण आता वाहन धुण्याच्या या व्यवसायात तरबेज झाल्या आहेत. मात्र, त्यांचा हा प्रवास थक्क व मन हेलावणार आहे. शिवाय निराधार महिलांना प्रेरणा देणाराही ठरत आहे.
कोरोनाची कुऱ्हाड चौघींवरही कोसळली..
कोरोनाच्या परिस्थितीनंतर खरंतर अनेकांच्या हाताचे काम गेले आहे, कुटुंब कसं चालवायचं अशा विवंचनेत अनेक जण होते, त्याचप्रमाणे सांगलीच्या शामराव नगर भागातल्या गीता गायकवाड, साहिरा शेख, सविता जाधव आणि सुमैय्या बागणीकर या चारही महिलांचे कुटुंब त्यांच्याच जीवावर चालत होते. मात्र या चौघींनाही कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसला, आणि त्यांच ही जगणं हलाकीचे झाले.
कुटुंब चालवणे बनला यक्ष प्रश्न..
गीता गायकवाड यांचा चहाचा गाडा बंद पडला, तर साहिरा शेख यांचा वडापावचा गाडा बंद पडला, सविता जाधव यांचे पती आकस्मित आजाराने ग्रस्त आहेत, तर सुमय्या बागणीकर यांच्यासमोर आर्थिक विवंचनेना यामुळे या चौघींना आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणे मुश्कील झाले होते. चौघींची घरची परिस्थिती अत्यंत बेताची बनली होती. लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला कशी-बशी मदत मिळाली. मात्र त्यानंतर मदत मिळणं बंद झाले. त्यामुळे त्यांच्या समोर आता कुटुंब चालवण्याचा यक्ष प्रश्न होता.
एक वेळेचे खाणे ही बनले होते मुश्कील..
यातील गीता गायकवाड या निराधार, स्वतः कमवायचे आणि जगायचे. त्यांना पती, मुलं-बाळ कोणीच नाही. भाड्याच्या खोलीत राहत चहाच्या गाड्यावर आपला चरितार्थ त्या चालवत होत्या. मात्र, लॉकडाऊननंतर चहाचा गाडा बंद पडला, त्यानंतर त्यांच्यावर जणु उपासमारीची वेळ आली. त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत हे केली. मात्र ती मदत संपल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले, अशी स्थिती आली की घरात एक वेळचे अन्नही नव्हते. सिलिंडर संपलेला, अशा या परिस्थितीत करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढ्यात 'आ'वासून उभा होता.
या हलाखीच्या प्रसंगात त्यांच्या भागातील ओळखीचे असणारे ट्रक मेकॅनिकल अकबर मुजावर आणि त्यांच्या पत्नी रुबीना मुजावर या जणू त्यांच्यासाठी देवदूतच बनून आल्या, गीता गायकवाड यांची सर्व परिस्थिती पाहून त्या दोघा पती-पत्नींनी त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. मात्र स्वावलंबी असणाऱ्या गायकवाड यांनी त्या मदती पेक्षा कामाची अपेक्षा त्यांच्यासमोर ठेवली. त्यानंतर मुजावर दाम्पत्यांनी यावरून कळवतो, असे सांगत निरोप घेतला. काही दिवसात मुजावर दांपत्य हे गीता गायकवाड यांच्या घरी पुन्हा पोहचले आणि त्यांनी त्यांच्या बंद पडलेल्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग सेंटर सुरू करण्याबाबत त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला.
चार चौघींच्या आयुष्याची नवी सुरुवात..
खरंतर दुचाकी आणि चारचाकी गाड्या धुण्याचा कोणताच अनुभव नसताना हा व्यवसाय सुरू कसा करायचा? हा प्रश्न गीता गायकवाड यांच्यासमोर निर्माण झाला होता. शिवाय हे पुरुषांचे काम आणि व्यवसाय. ते आपल्या एकटीला कसे शक्य होणार? असा प्रश्न त्यांनी मुजावर यांना विचारला. यातून मुजावर यांनी गायकवाड यांना धीर देत, सर्व काही शिकवण्याचे आश्वासन दिले, गायकवाड यांच्यासारख्या अन्य तीन महिलांना मुजावर यांनी एकत्र करून चौघींना सर्व्हिसिंग सेंटर सुरू करून दिले.
मदत म्हणून उचलले पाऊल..
अकबर मुजावर आणि रुबीना मुजावर यांनी खरे तर चौघींसाठी जगण्याचे एक नवा मार्ग खुला केला. मुजावर म्हणतात, की गीता गायकवाड यांच्याशी जाताना झालेली विचारपूस, त्यामधून समोर आलेली भीषण परिस्थिती, त्यामुळे अशा या निराधार महिलांच्यासाठी काही तर मदत करायचे, असा विचार डोक्यात आला होता, आणि आपल्या पत्नीसोबत याबाबत विचार करून आपल्या जागेत सर्व्हिसिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चौघींनाही तयार करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत त्यांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे आज पत्नी रुबीना हिच्यासह चौघीही यशस्वीरित्या सर्व्हिसिंग सेंटर चालवत आहेत. त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला ही खूप आनंद देणारी गोष्ट असल्याचे मुजावर आवर्जून सांगतात.
पोटासाठी उचलला पाईप..
यापैकी साहिरा शेख यांचा चहाचा गाडा होता, तोही कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बंद पडला. साहिरा शेख यांचे कुटुंब चहाच्या गाड्यावर येणाऱ्या कमाईवर चालत असत,मात्र त्यांनाही कुटुंब चालवणे अवघड बनलं होतं. त्यांच्यासमोर ही मुजावर आणि सुमय्या बागणीकर यांनी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये काम करण्याचे सुचवले, पण त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता, हे काम जमणार का? शिवाय त्यांचा मुलाचे मित्र याचा भागात राहत असल्याने, अशा ठिकाणी काम करणे बरोबर दिसणार नाही, असा विचार त्यांच्या समोर आला. पण शेवटी पोटाचा प्रश्न होता अन् त्यांनीही हातात पाण्याचा पाईप घेऊन गाड्या धुण्यास सुरुवात केली.
कोण काय म्हणतंय यापेक्षा पोटाचा प्रश्न महत्वाचा...
सविता जाधव यांची कहाणी ही मन हेलावणारी आहे,सविता यांचे पती एक सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात कामाला होते. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पतीची बायपास सर्जरी झाली, त्यानंतर त्यांना घरीच राहावं लागले, नोकरी गेली, अशा परिस्थितीमध्ये कोणतीही मदत त्यांना कोणाकडून झाली नाही. मुलाचे शिक्षण आणि कुटुंब चालवणे, पतीचे आजारपण असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.अशा परिस्थितीमध्ये अकबर मुजावर यांनी त्यांना सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करण्याबाबत विचारणा केली. सुरुवातीला त्यांनाही या कामाच्या बाबतीत थोडसे अवघड वाटले आतापर्यंत घरातली धुणी-भांडी आपण केली. मात्र या गाड्या कशा धुवायच्या? पुरुषी मक्तेदारी असणारे हे काम आपल्याला जमणार का? असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मात्र त्याहून त्यांना पोटाचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचा होते. त्यामुळे त्यांनीही या सर्व्हिसिंग सेंटर मध्ये काम करायला सुरुवात केली, हे करत असताना अनेकांनी त्यांना या कामाबाबत हिणवले. मात्र, पोटासाठी काम करताना लाजयचे कश्याला, असा निश्चय करत त्यांनी कोण काय म्हणतंय याकडे दुर्लक्ष करणे अधिक पसंत केले.
वया पेक्षा पोटाचा विचार महत्वाचा..
या चौघां मधल्या सुमय्या बागणीकर या जेष्ठ आहेत. पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन, त्यामुळे त्या एकट्याच अशा परिस्थितीमध्ये शालेय साहित्य बायडींग करण्याचे काम करून आपले पोट भरत होत्या. मात्र कोरोनाच्या परिस्थितीनंतर त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली. त्यांच्या समोरही सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करण्याबाबतची विचारणा झाली, आणि पटकन त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला. वयाचा विचार न करता सुमैया बागणीकर या देखील आता वाहन धुण्यासाठी सज्ज असतात.
समाजाच्या अहवेलनाकडे केले दुर्लक्ष..
तश्या चौघेही निराधारच म्हणाव्या लागतील, कारण घरात कोणीच कमावता पुरुष नाही, मुलांचे शिक्षण, कुटुंब चालवणे अश्या परिस्थितीमध्ये या चौघींच्या समोर निर्माण झालेला पर्याय खरेतर सुरुवातीला त्यांना खूपच आव्हानात्मक होता. समाजाकडूनही सुरुवातीला अहवेलना झाली. मात्र चौघींनी ही कशाचीही पर्वा न करता हातात हात घालून घरातल्या धुणे-भांड्याप्रमाणे गाड्यांच्या धुण्याची कला अवगत केली. आता यामध्ये त्या पारंगत बनल्या आहेत, अवघ्या काही तासांमध्ये त्या दुचाकी आणि चार चाकी गाड्या धवून हातावेगळ्या करतात.
क्लीन गाडीसाठी ग्राहकांची पसंती..
आता या महिला चालक सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गाड्या धुण्यासाठी ग्राहकांचा कल वाढत आहे. त्या ठिकाणी येणारा ग्राहक हा महिला चांगल्या पद्धतीने गाड्या धुऊन देतात, यावर विश्वास बसला आहे. शिवाय महिलांनाही प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही अनेक जण आपल्या गाड्या धुण्यासाठी या ठिकाणी घेऊन येतात.
निराधार महिलांसाठी प्रेरणा..
खरतर चौघींचे आयुष्य कोरोनामुळे अडचणीचे बनले होते. मात्र त्यानंतर त्यांनी उचललेले पाऊल त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे तर ठरलेच, शिवाय इतर महिलांनाही प्रेरणादायी बनले आहे.