सांगली - चांदोली धरणातील पाण्याने तळ गाठल्याने वारणा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदी काठच्या गावांमध्ये आता पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या पश्चिम भागाला वरदान असणाऱ्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. 35 टीएमसी इतक्या पाणी साठ्याची क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 1.15 टीएमसी इतका अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हाचे तापमान यामुळे आधीच धरणातील पाणीसाठ्यात घट झाली होती. थोड्या प्रमाणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यावर आतापर्यंत वारणा काठच्या गावांची तहान भागात होती. मात्र, आता पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
जून महिना सुरू होऊनही पाऊस नाही. मे महिन्यापासून घटत चाललेल्या पाणी पातळी आता मृत संचयाकडे वाटचाल करत आहे. यामुळे धरण प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. त्यामुळे वारणा नदी पात्र कोरडे पडत आहे. वारणा नदीच्या पाण्यावर जवळपास शिराळा व वाळवा कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावे अवलंबून आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांवर आता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.