सांगली- जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यामुळे कृष्णा नदीमध्ये माशांचा अक्षरश: पूर आला आहे. संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णाकाठी मासे पकडण्यासाठी झुंबड उडाली असून मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत.
संततधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीतील मासे पकडण्यासाठी सांगली नजीकच्या कसबे डिग्रज येथील बंधाऱ्याजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात मासे येथे सापडत आहेत. मासे अलगत हाताला लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची मासे पकडण्यासाठी झुंबड उडत आहे. तर मच्छीमारांना दिवसात जेवढे, मासे सापडत नाहीत, तेवढे मासे येथे सापडत आहेत. तब्बल 27 पोती मासे यावेळी नागरिकांना सापडले आहेत. त्यामुळे माशांचा पूर आल्याचे पाहायला मिळत होते. यामुळे परिसरातील गावांतील घरांमध्ये माशांचा बेत असणार आहे.