सांगली - पाचशेच्या नोटा हातात घेताच त्याचे तुकडे पडत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात समोर आला आहे. एका वृद्ध महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला असून यामुळे नव्या पाचशेच्या नोटांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सांगलीच्या विटा येथे मोलमजुरी करणाऱ्या एका वृद्ध महिलेला दीड महिन्यांपूर्वी कामाच्या मोबदल्यात ७ हजार रुपये मिळाले होते. या नोटा तिने घरातील एका कपाटात ठेवल्या होत्या. सोमवारी तिने बाजारात जाण्यासाठी ७ हजारांमधून साडे तीन हजार रुपये काढले आणि रुमालात बांधून बाजारात नेले. यावेळी मिरची खरेदीनंतर पैसे देण्यासाठी महिलेने पाचशेची नोट काढली असता, त्या नोटेचे आपोआपच तुकडे पडले, यानंतर महिलेने आपल्या जवळच्या सर्व नोटांची तपासणी केल्यानंतर सुकलेल्या पानाचे तुकडे पडल्याप्रमाणे नोटांचे तुकडे पडत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
घाबरलेल्या महिलेने शेजारी राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावर राठोड यांनी महिलेच्या घरातील इतर पाचशेच्या नोटांची तपासणी केली. त्यांना नोटांची घडी घातल्यानंतर त्या मोडून पडत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर राठोड यांनी या सर्व नोटा घेऊन शहरातील स्टेट बँक गाठली आणि या नोटा खऱ्या आहेत का, याची शहानिशा केली. त्यावेळी या सर्व नोटा खऱ्या असल्याचे समोर आले. मात्र, या नव्या पाचशेच्या नोटांचे, अशा पद्धतीने कसे तुकडे होतात. याबाबत बँक अधिकारीसुद्धा संभ्रमात पडले.
एखाद्या केमिकल किंवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्याने हा प्रकार होत असल्याचे स्टेट बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे राठोड यांनी रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याची मागणी केली. या प्रकारामुळे विट्यात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेकांनी आपल्याकडील पाचशेच्या नोटा बदलण्यास सुरुवात केली आहे.