सांगली - शहरात एका प्लास्टिक पोत्याच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत कारखाना जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. सांगलीच्या अहिल्यानगरमध्ये असणाऱ्या संजय इंडस्ट्रीज या कारखान्याला आज दुपारी भीषण आग लागली. प्लास्टिक पोत्याचा हा कारखाना असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप धारण केले आणि बघता-बघता हा संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
आगीची माहिती मिळताच सांगलीसह आसपासच्या सुमारे १० अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी पोहचल्या होत्या. उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. मात्र, या भीषण आगीत कारखान्यात असणारे प्लास्टिक पोते हे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ही आग नेमकी कशी लागली. याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.