सांगली - जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कांदे येथे महाराष्ट्रदिनी गावातील जोतिर्लिंग देवालयामध्ये ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेत महिला सरपंचास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांवर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
महाराष्ट्रदिनी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना ग्रामसभा आयोजीत करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे शिराळा तालुक्यातील कांदे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुवर्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. यावेळी विविध विषयावर वाचन चालू असताना गावातील निशिकांत गोळे यांनी घंटागाडीचा विषय मांडला. यावर सरपंच सुवर्णा पाटील या ग्रामपंचायतील घंटागाडीबाबत येणाऱ्या अडचणी समजून सांगत असतानाच विक्रम पाटील याने तू गेली एक वर्ष झाले तरी गाडी आणु शकत नाहीस, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता त्यांने हातातील माईक हिसकावून मारहाण केली. तर सागर सर्जेराव पाटील, रणजित शिवाजी पाटील यांनी झटापट करत सरपंच पाटील यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. शिवाय काही जणांनी सुवर्णा पाटील व पती बाळासो पाटील याना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सरपंच सुवर्ण पाटील यांनी शिराळा पोलिसांत तक्रार दिली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.