सांगली - वाळवा तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे गाव म्हणजे धोत्रेवाडी या गावाला कोरोना पासून दूर ठेवण्यामध्ये महिला सरपंच वनिता हणमंत माळी यांना यश आले आहे. कोरोना महामारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र होरपोळून जात असताना या गावात मात्र सात महिन्यामध्ये एक ही रुग्ण सापडला नाही. फक्त दहावी शिक्षण झालेल्या सरपंच वनिता माळी या दुर्गेचा अवतार घेऊन जणू गावाच्या वेशीवर उभे असल्यानेच कोरोनाने गावात प्रवेश केला नसल्याचे नागरिकातून बोलले जाते. त्यांनी कोरोना काळात राबवलेले उपक्रम हे उल्लेखनीय आहे.
राजकारणाशी कसलाही संबंध नसताना व एक महिला असून ही अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मागील तीन वर्षात त्यांनी पूर परिस्थिती असो की सध्याची कोरोना महामारीमध्ये हिरीरीने सहभाग घेत आहेत. तर यासाठी त्यांना ग्रामस्थ व कुटुंबाची मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. त्यांनी गावच्या हितासाठी दहा बचत गट काढून एक टक्के व्याजाने पाच लाखापर्यंत कर्ज देऊन नागरिकांची सोय केली आहे. यामुळे कर्जासाठी लोकांची बँकेकडे ससेहेलपट थांबली आहे. तर गावाला शंभर टक्के शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तर सरपंच पद हे फक्त मिरवण्यासाठी नसून गावच्या व समाजाच्या सेवेसाठी आहे. महिला सरपंचानी फक्त नावापुरते राहू नये स्वतः खुर्चीत बसून निर्णय घ्यायला शिकले पाहिजे असे वनिता माळी म्हणतात. वनिता यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी वनिता यांना तालुका कार्यकारणीमध्ये स्थान दिले आहे. तर एक महिला सरपंच असून कोणाचा ही दबाव न घेता केलेले काम हे इत्तर महिला सरपंच यांच्यासाठी एक आदर्श ठरणार आहे.