सांगली - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या दूध संकलन केंद्र आणि डेअरीवर जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात दोन ठिकाणांवरून तब्बल 4 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुधात भेसळ केल्याच्या संशयावरून दीड हजार लिटर दूध ओतून नष्ट करण्यात आले. मिरजेच्या एरंडोली येथे अन्न व औषध प्रशासनकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील एरंडोली या ठिकाणी असणाऱ्या सूर्यप्रकाश दूध संकलन आणि पाटील मिल्क आणि प्रॉडक्ट या दोन ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सूर्यप्रकाश दूध संकलन केंद्र आणि पाटील मिल्क अँड प्रॉडक्ट या दोन ठिकाणी छापे टाकले. यावेळी त्या ठिकाणी संकलन करण्यात येणाऱ्या गाई आणि म्हैशीच्या दुधात भेसळ करण्यासाठी दूध पावडर आणि ट्रायसोडियम सायट्रेट वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.
या कारवाईत 2 हजार 123 किलोग्रॅम दूध पावडर आणि 30 किलोग्रॅम ट्रायसोडियम सायट्रेट यासह भेसळ केलेले दूध, पनीर, खवा असा एकूण 4 लाख 16 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, यापैकी जप्त करण्यात आलेले दीड हजार लिटर दूध भेसळीच्या संशयावरून ओतून नष्ट करण्यात आले आहे. जप्त केलेल्या या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन सांगली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले.
हेही वाचा - सहाय्यक आयुक्तासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला, कारवाईसाठी गेले असता घडला प्रकार