सांगली - प्रसिद्ध मराठी गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सांगलीच्या दुधगाव या जन्मगावी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्यानंतर इलाही जमादार यांचे नाव मराठी गझल कवी म्हणून घेतले जाते.
मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये 1 मार्च 1946 ला इलाही जमादार यांचा जन्म झाला. मात्र त्यांची कर्मभूमी ही पुणे राहिली आहे. वयाच्या 21 व्या वर्षानंतर म्हणजे 1964 नंतर इलाही जमादार यांनी काव्य लेखनाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांच्या दर्जेदार काव्य लेखनामुळे त्यांना आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून ओळख मिळाली. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांमधून इलाही जमादार यांच्या कविता व गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच नवोदित कवींसाठी इलाही जमादार यांनी गझल क्लिनिक ही कार्यशाळा देखील सुरू केली होती.
एक नजर इलाही जमादारांच्या जीवनप्रवासावर
आकाशवाणीवर युवावाणी या कार्यक्रमात त्यांचे काव्यवाचन त्याचबरोबर मराठी सुगम संगीत, स्वरचित्र यासारख्या कार्यक्रमांतून इलाही जमादार यांच्या काव्यांचे प्रसारण होत असे. दूरदर्शनवर गाजलेल्या ’आरोही’ या कार्यक्रमात इलाही यांनी स्वरबद्ध केलेली हिंदी गीते प्रसारित झाली आहेत.
तसेच आखरी इन्तजार, सनक या काही टेलिफिल्म्ससाठी देखील त्यांनी गीतलेखन केले आहे. त्याचबरोबर एहसास अपने अपने, स्वामी समर्थ, पुलिस भी एक इन्सान है, चलो मछिंदर गोरख आयो, या हिंदी मालिकांसाठी आणि मर्मबंध, सप्तरंग, नसते उद्योग, गणेश पुराण, राजा शिवछत्रपती या मराठी मालिकांसाठीही इलाही जमादार यांनी गीतलेखन केले आहे. इलाही जमादार यांचे ’जखमा अशा सुगंधी' व ’महफिल-ए-इलाही' हे काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रसिद्ध होते. तसेच त्यांचे अनुराग, अनुष्का, अभिसारिका, मुक्तक हे काव्य आणि गझल संग्रह प्रसिद्ध आहेत.
प्रसिध्द गझलकार
ईलाही जमादार यांनी गीत लेखन, काव्य लेखन, गझल लेखणातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. देशभरात इलाही जमादार यांचे कार्यक्रम होत असत. मराठीतील प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्यानंतर इलाही जमादार यांचे नाव गझलकार म्हणून प्रामुख्याने घेतले जाते.