सांगली - ब्रह्मनाळ येथे महापुरात बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना उलटला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चौकशीच्या घोषणेचे काय झाले? चौकशी बासनात गुंडाळून ठेवली आहे का? दोषींना सरकार वाचवत तर नाही? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांना न्याय मिळणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे सर्व होत असताना 8 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ याठिकाणी घडली होती. महापुरात नागरिकांना वाचवताना बोट पलटी होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता. यात दीड महिन्याच्या मुलीसह 16 महिला आणि एक वृद्धाचा यामध्ये बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता.
ब्रम्हनाळ गावात पाणी वाढत असताना गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेली बोटींची मागणी, मागणीला प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, अशा सर्व गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या निद्रिस्त व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले होते. तर सतरा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला होता.
मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशाला केराची टोपली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, सांगलीत येऊन ब्रम्हनाळ घटनेची स्वतः सखोल चौकशी करून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यालाच अनुसरून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीसुद्धा या दुर्घटनेची चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची गय केली जाणार नाही, अशी वलग्ना केली होती.
मात्र, या दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे आणि अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा या प्रकरणात दोषी कोण? हे समोर येऊ शकलेले नाही. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली मिळाली, की प्रशासनाला वाचवण्यासाठी चौकशी बासनात गुंडाळून ठेवला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - आयारामांमुळे सत्ताधारी पक्षातील अनेकजण आमच्या संपर्कात - वडेट्टीवार
ग्रामपंचायतीची अजब भूमिका
यावर कडी म्हणजे घटनेनंतर काही दिवसांनी ब्रम्हनाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंडळींनी महापुराच्या काळात सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत घेत शब्बासकीची थाप दिली. इतकेच नव्हे तर पाण्यात असणाऱ्या वायरमध्ये पंखा अडकल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगत एक प्रकारे या घटनेला कोणीच दोषी नाही, असाच निर्वाळा दिला. खरेतर काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळे त्या 17 जणांच्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही का? असा उद्विग्न प्रश्न निर्माण केला आहे.
हेही वाचा - वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने 25 कुटुंबीयांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर आश्चर्य तर व्यक्त केले आहे. शिवाय प्रशासनाने दबाव टाकून हे सर्व करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे पाणी मुरतंय, असे स्पष्ट होत आहे.
ब्रह्मनाळ घटना खरेतर प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी होती. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले स्वतः जबाबदार होते? की त्यांना बुडताना प्रशासनाचा न मिळालेला हात, हा प्रश्न आहे. पण याची वाच्यता कुठेच होताना दिसत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
हेही वाचा - भिडेंनी तोडले अकलेचे तारे.. म्हणे एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी