सांगली - दिवसेंदिवस सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने स्पेशल टास्क फोर्स स्थापन केले आहे. माजी सैनिकांची समावेश असणाऱ्या या पथकामार्फत कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यावर उतरून या टास्क फोर्सकाडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात गेल्या ८ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडून कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका प्रशासनाने आता कोरोना उपाययोजनाचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी स्वतः च सेप्शल टास्क फोर्सची स्थापन केली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी माजी सैनिकांची हा टास्क फोर्स तयार केला आहे. यामध्ये 10 माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली असून हे माजी सैनिक सांगली मनपा क्षेत्रात फिरून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आशा परिस्थितीत नागरिकांकडून कोरोना प्रतिबंध उपायोजनांचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे नियमबाह्य वागणाऱ्या आणि कोरोना साथीच्या वाढीसाठी जबाबदार ठरणाऱ्या नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांनी 10 माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. हे 10 माजी सैनिक महापालिका सेवेत दाखल झाले आहेत.
या टास्क फोर्सकडून शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारत नागरिकांना सोशल डिटन्स पाळणे, मास्क वापरणे तसेच रस्त्यावर न थुंकणे याबाबत जागृती करण्यात येत आहे. या स्पेशल टास्क फोर्सकडून सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या, तसेच मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर जे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणार नाहीत आणि तसे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. आजपासून हे 10 माजी सैनिक लष्करी पोशाखात शहरात कारवाईसाठी फिरत आहेत. त्यामुळे आता कोरोना नियम मोडणाऱ्यांना या टास्क फोर्सच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.