जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २३) हे शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढा देत असताना जवान रोमित यांना वीरमरण आले.
एका दहशतवाद्याला कंठस्नान -
जैनापुरातील चेरमार्ग भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी या परिसराची घेराबंदी करून सर्च ऑपरेशन केले. याच दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले, त्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. पण राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात असलेले शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण तसेच संतोष यादव हे दोघे जवान शहीद झाले.
सांगलीतील जवान रोमित चव्हाण शहीद -
पाच वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये रोमित भरती झाला होता. त्याचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे तर, माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात झाले होते. उच्च शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठवडगाव येथे झाले होते. इयत्ता बारावी कला शाखेत पास झाल्यानंतर ते भारतीय सैनिक दलामध्ये भरती झाले होते.
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखान्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात वडील, आई व एक बहीण असा परिवार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले.
रविवारी अंत्यसंस्कार -
रविवारी (दि. २०) दुपारनंतर शहीद जवान रोमितचे पार्थिव शिगाव येथे पोहचण्याची शक्यता आहे. त्याचे शासकीय इतमामात वारणा नदी काठी अंत्यसंस्कार होणार आहे.