सांगली - गावगुंड शेतात येऊ देत नाहीत, पोलीस कारवाई करत नाहीत, ऊभे पिक गावगुंड चोरून नेत आहेत. या सगळ्या प्रकारच्या त्रासाला कंटाळून वाळवा तालुक्यातील कापुसखेड येथील वृध्द दाम्पत्य शेतातच आत्मदहन करणार आहे. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला हे दाम्पत्य आत्मदहन करणार आहे. याबाबत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर सर्व विभागाना त्यांनी निवेदन दिले आहे.
शेतात ये-जा करण्यास अडचणी -
कापुसखेड येथील रामचंद्र तातोबा नायकवडी आणि त्यांची पत्नी आनंदी नायकवडी असे या दाम्पत्याचे नाव आहे. नायकवडी यांची गावापासून दूर बहे गावच्या हद्दीत सोळा गुऺठे जमीन आहे. ही जमीन कुलमुखत्यार म्हणून आनंदी नायकवडी यांच्या नावाने आहे. या जमीनीच्या शेजारच्या बड्या शेतकऱ्यांनी नायकवडी यांना जमिनीत येण्या-जाण्यासाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यातूनही पिक घेतले तर ते रात्री कापून नेले जाते. याबाबत इस्लामपूर पोलीसात वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.
न्यायालयाच्या निकालानंतरही त्रास सुरूच -
याबाबत गेल्या तेरा वर्षात विविध न्यायालयाने नायकवडी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. एका खटल्यात तर या लोकांना न्यायालयाने दऺडही ठोठावला आहे. तरीही आमचा त्रास कमी झालेला नाही. शेतातील शेजारी गुऺड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहे. त्यामुळे आम्ही आता आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम आहोत. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला आम्ही आत्मदहन करणार असल्याचे आंनदी नायकवडी यांनी सांगितले आहे.