सांगली - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत एका रात्रीमध्ये चार फुटांनी वाढ झाली आहे, तर वारणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.
शहरात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, दुपारनंतर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या शिराळा मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या धरणातून १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी सहा फुटांवर होती (आयर्विन पुलाखाली). रात्री यात वाढ होऊन ती दहा फुटांवर गेली आहे. त्यामुळे आयर्विन पुलानजीक असणारा सांगलवाडीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे सांगली शहरातील जन-जीवनावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना आता पेरणीचे वेध लागले आहेत.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुरुड समाजातील महिलांनी कृष्णा नदीची विधीवत ओटी भरली. कृष्णामाई कोपू नको, असे साकडे या महिलांनी नदीला घातले.