सांगली - शिवीगाळ केली म्हणून मुलाने आईचा खून केला. याप्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. वसंत वाघमारे असे आरोपीचे नाव आहे.
सांगलीच्या आटपाडी येथील येथे ४ मार्च २०१८ रोजी राणी वाघमारे (वय ७०) या वृद्धेचा खून झाला होता. वाघमारे यांच्या मुलानेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी वसंत वाघमारेला अटक केली.
वसंत वाघमारेला दारूचे व्यसन होते. यामुळे वैतागलेली वृद्ध आई त्याला शिवीगाळ करायची. या रागाच्या भरात वसंत वाघमारेने आई राणी वाघमारे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत निर्घुण खून केला. या खून खटल्याप्रकरणी बुधवारी १९ जूनला जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. ज्यामध्ये सरकारी पक्षाकडून चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने वसंत वाघमारेला दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती आरती देशपांडे साटविलकर यांनी काम पाहिले.