सांगली - शहरातल्या चिन्मय पार्क याठिकाणी मटणामधून विष घालून भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वेळा भटका कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही जण यामध्ये दगावले सुद्धा झाले आहेत. पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा अद्यापी बंदोबस्त करण्यात आला नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळ्यात कुत्री पिसाळतात. या पार्श्वभूमीवर शहरातल्या संजयनगर भागातील चिन्मय पार्क येथे पाच ते सहा कुत्र्यांना विष घालून ठार मारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मटनाच्या तुकड्यातून विष घालून ते ठेवण्यात आले होते आणि हे मटण खाल्याने पाच ते सहा कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेत,याबाबत संताप व्यक्त केला आहे.