सांगली - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करावे, अशा सुचना खासदार धैर्यशील माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. धैर्यशील माने व युवानेते सम्राट बाबा महाडीक यांनी संयुक्तरित्या दौरा करत नुकसानाची पाहाणी केली. शिराळा व वाळवा तालुक्यातील मांगले, कांदे, सागाव, शेखरवाडी, कार्वे, येडेनिपाणी या गावांना दोघांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा व शिराळा तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका बसला. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि प्रस्ताव शासनाला सादर करावेत. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेतली जावी, असे माने यांनी सांगितले आहे.
माने यांच्या पाहाणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, निजाम मुलाणी, विदया पाटील, अरविंद बुद्रुक, विठ्ठल गडकरी, सुमित पाटील, विजय गराडे, सागर दशवंत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.