सांगली - चांदोली धरणासह परिसराचा आता लवकरच कायापालट होणार आहे. राज्य सरकारने जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या धरण परिसरांचा खासगी यंत्रणांच्या माध्यमातून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चांदोली धरणाच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात असणाऱ्या चांदोली धरण आणि अभयारण्यात वन, जल आणि निसर्ग संपदा आहे. त्यामुळे पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून चांदोलीची ओळख आहे. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुविधांचा मोठा अभाव याठिकाणी आहे. अनेकवेळा या परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, ते कागदोपत्री मर्यादित राहिले. आता राज्य सरकारने जलसंपदाच्या खात्याअंतर्गत येणारे धरण, विश्रामगृह आणि परिसरात असणारी जागा, खासगी यंत्रणेद्वारे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या चांदोली धरणाचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विकास पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे याठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या अनेक योजना निर्माण होणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने 35 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या धरणाच्या जलाशयात नौकाविहार, जलक्रीडा, परिषद-प्रदर्शन केंद्र, सुसज्ज विश्रामगृह, मनोरंजन पार्क, रोप-वे अशा अनेक पर्यटनाला चालना देणाऱ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. चांदोली परिसरात मोठी वैविधता आहे. या ठिकाणी विविध फुलांचे पठार, धबधबे, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प विस्तीर्ण जलाशय अशा सर्व गोष्टी पाहता, सरकारच्या निर्णयानुसार विकास झाला, तर एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून चांदोली आणखी नावारूपाला येणार आहे.