सांगली - मिरजेत सहाय्यक आयुक्तांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत असताना फळ विक्रेत्याकडून हा हल्ला झाला आहे. यामध्ये मारहाण आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला असून याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित फळ विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज शहरातील बोकड चौक या ठिकाणी रस्त्यावर फळविक्री सुरू होती. त्या ठिकाणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अतिक्रमणाचे पथक पोहोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी गर्दी होत असल्याने फळ विक्रेत्याला विक्रीस मज्जाव केला. त्यामधून पालिका कर्मचारी आणि त्या फळविक्रेते यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून फळ विक्रेत्याने आपल्याकडे असणाऱ्या लोखंडी गजाने पालिका आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न फळ विक्रेत्याकडून झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तरी या घटनेनंतर सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित फळविक्रेत्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - आईचा कोरोनाने मृत्यू, स्मरणार्थ 'त्याने' उभारले कोविड रुग्णालय