सांगली- येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरतीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा सुधार समितीकडून मध्यवर्ती नोकर भरतीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सहकार निबंधक विभाग आणि बँकेच्या अध्यक्षांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा- 'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 400 लिपिक पदासाठी नोकर भरती करण्यात आली. एका त्रयस्थ कंपनीकडे या नोकर भरतीचा ठेका मध्यवर्ती बँकेकडून देण्यात आला. नुकतेच या भरतीची प्रक्रिया पार पडली. मात्र, या भरतीमध्ये कायदेशीर बाबींना फाटा देण्यात आल्याचा आरोप अनेक परीक्षार्थींनी केला. लेखी आणि तोंडी परीक्षा घेण्यात आल्या. पात्र असलेल्या सर्वांचे गुण एकत्रित जाहीर करण्यात आले. अपात्र असलेल्या परीक्षार्थींच्या गुणांचे वर्गीकरण करण्यात आले.
याबाबत संबंधित कंपनीला पात्र उमेदवारांच्या गुणांच्या वर्गीकरणाबाबत अनेक वेळा विचारणा करण्यात आली. मात्र, त्याचे उत्तर अद्याप देण्यात आले नाही. यामुळे या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत परीक्षार्थीनी या सर्व परीक्षा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सांगली जिल्हा सुधार समितीच्या नेतृत्वाखाली याबाबत लढा सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिलीप पाटील यांनी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन जिल्हा सुधार समितीला दिल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. तर याबाबत बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, एकूणच जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या नोकर भरतीमध्ये घोटाळा झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.