सांगली : तीन लहानग्या मुलींसह आईचा मृतदेह तलावामध्ये आढळून आले आहेत. जत तालुक्यातल्या बिळूर येथे मायलेकींच्या तलावात बुडून मृत्यू ( Death by drowning in lake ) झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान हा अपघात आहे की घातपात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
सोमवारी रात्री १ वाजता निदर्शनास आली घटना : जत तालुक्यातील बिळूर येथील बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी वय २७, अमृता तुकाराम माळी वय १३, अंकिता तुकाराम माळी वय १०, ऐश्वर्या तुकाराम माळी वय ७ असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता निदर्शनास आली.
चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला : पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तिन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी अथणी येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलिस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सोमवारी रात्री एक वाजता चौघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटने बद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती. तपास जत पोलीस करत आहेत.