सांगली - जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीला महापूर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या 107 गावांचा संपर्क तुटला आहे, तर हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधींनी घेतलेला महापुराचा हा आढावा...
अतिवृष्टी तसेच चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदीला महापूर आलेला आहे. दोन्ही नद्यांनी आता रौद्र रूप धारण केले आहे. दोन्ही नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच सखल भागात महापुराचे पाणी साचले आहे. महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मिरज, वाळवा, शिराळा आणि कडेगाव या ४ तालुक्यांमधील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
सांगली शहरातल्या पाण्याची पातळी आता 45 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे सांगली शहरानजीकचा इस्लामपूर-पुणे बायपास पाण्याखाली गेला आहे. परिणामी या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश देण्यात येत आहे, तर इतर वाहनांसाठी सांगलीतल्या आयर्विन पुलावरून प्रवेश सुरू केला आहे. त्याचबरोबर शहरातल्या दत्तनगर, काका नगर, सूर्यवंशी प्लॉट पूर्ण पाण्याखाली गेले आहे. येथील जवळपास 700 हून अधिक घरे महापुराच्या विळख्यात अडकलेली आहेत. येथील 700 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून गेल्या चोवीस तासात 430 मिलिमीटर पावसाची ऐतिहासिक नोंद झाली आहे. त्यामुळे धरण जवळपास भरले आहे. धरणातून आता 34 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली असून वारणा नदीलाही महापूर आलेला आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यातल्या अनेक गावांचा कोल्हापूर जिल्ह्याची असणारा जवळचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे.