सांगली - जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या वादळी पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कुरळप - येलूर रस्त्यालगत असणाऱ्या राजन महाडिक यांच्या 8 एकर शेतातील संपूर्ण आडसाली ऊस भुईसपाट झाला आहे. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या वाळवा, शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे भात व खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर काही ठिकाणी वादळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कुरळप - येलूर रस्त्याकडेला असणाऱ्या राजन महाडिक यांच्या 8 एकर शेतातील संपूर्ण आडसाली ऊस भुईसपाट झाला आहे, तर पडलेल्या ऊसाच्या मुळ्या तुटल्याने उसाची वाढ थांबून परिणामी वजनात घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडली असताना आता वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. शिराळा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेल्याने नदी काठावरील शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम असून, वारणा नदी दुधडी भरून वाहत आहे. ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला असल्याने वारणा नदी काठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.