सांगली - राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये दलित महासंघानेसुद्धा आता उडी घेतली आहे. यापुढे कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय दलित महासंघाच्यावतीने घेण्यात आला आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या दलित महासंघाच्या राजकीय परिषदेमध्ये संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी ही घोषणा केली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय परिषद पार पडली आहे. परिषदेमध्ये सांगलीतील सचिन जाधव यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह दलित महासंघात प्रवेश केला. जाधव यांची या परिषदेत सांगली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सतीश मोहिते यांच्यासह सांगली जिल्ह्यातील दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पार पडलेल्या परिषदेमध्ये मच्छिंद्र सकटे यांनी देशातल्या आणि राज्यात जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे, ती वंचित बहुजन समाज आणि दलित समाजाला घातक आहे, असे मत मांडले. ही परिस्थिती बदलायची असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा वापर करत राजकीय भूमिका घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.