सांगली - यंदाच्या 'थर्टी फर्स्ट नाईट' अर्थात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनामुळे विरजण पडले आहे. याचा सर्वात मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी ऑनलॉकनंतर मोठया प्रमाणात तयारी करण्यात आली होती. मात्र, राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी लावल्याने 'थर्टीफर्स्ट' साजरा करणाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.
नवीन वर्षावर कोरोनाचे सावट -
'थर्टी फर्स्ट नाईट' हा पाश्चात्य संस्कृतीचा भाग असला तरी आता भारतीय संस्कृतीमध्ये तो चांगला रुळला आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक जण दरवर्षी मोठ्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत करतात. बहुतांशजण नवीन वर्षाचे स्वागत रेस्टॉरंट, हॉटेल, पब-बार यामध्ये जाऊन करतात. खाण्या-पिण्याचा आणि मनोरंजनाचा समावेश थर्टीफस्टच्या दिवशी सगळीकडेच पहायला मिळतो. हॉटेल व्यवसायिकांसाठी थर्टीफर्स्ट हा एक उत्सवच असतो. एक महिन्यापासून या दिवसासाठी हॉटेल व्यावसायिकांची तयारी सुरू असते. खाण्या-पिण्या बरोबर वेगवेगळ्या मनोरंजनासह अनेक पातळ्यांवर नियोजन केले जाते. दरवर्षी ग्राहकांचा याला भरघोस प्रतिसाद मिळतो. मात्र, यंदा या जल्लोषावर कोरोनाचे सावट आहे.
थर्टी फर्स्टला ग्राहक देणार का हॉटेल्सला पसंती?
यंदा हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊननंतर शासनाने 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे कशीबशी हॉटेल्स सुरू झाली. ख्रिसमस व 31 डिसेंबर हा हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बूस्टर ठरेल, अशी आशा होती. मात्र, कोरोनाचे सावट अजूनही आहे. त्यामुळे हॉटेल्स-बार यांना ग्राहकांचा जेमतेमच प्रतिसद मिळत आहे. यात आता शासनाने राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी ग्राहकांची हॉटेल्स-पब, बार यांना कितपत पसंती राहील? हा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांच्या समोर आहे.
थर्टी फर्स्ट सणाप्रमाणे -
हॉटेल व्यवसाय सध्या मोठ्या अडचणीत सुरू आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून व्यवसाय होत आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत आणि 50 टक्के क्षमता, अशा प्रकारे हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यामुळे हॉटेल्स आर्थिक दृष्ट्या फायद्यात नाहीत. हॉटेल व्यावसायिकांच्यादृष्टीने ख्रिसमस आणि 31 डिसेंबर हे एखाद्या सणाप्रमाणे असतात. त्या दिवसांची आम्ही एक महिना अगोदर तयारी करत असतो. कामगारांची जुळवा-जुळवा शिवाय इतर गोष्टींचेही नियोजन केले जात होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटांमुळे आता या सर्वांवर मर्यादा आल्या आहेत. आम्ही किमान आमच्या हॉटेलमध्ये 500 ग्राहकांच्या दृष्टीने नियोजन करत होतो. दरवर्षी अनेक जण ग्रुप बुकिंगसाठी येत असतात. मात्र, यंदा अद्याप कोणीही आले नाही. त्यामुळे 100 ग्राहकांचेही नियोजन करणे अडचणीचा विषय बनला आहे, असे हॉटेल व्यावसायिकांच्या खाद्य-पेय-विक्रेते संघटनेचे अध्यक्ष लहू भडेकर यांनी सांगितले.
हॉटेल व्यवसायाला मदतीची गरज -
शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असणारे हॉटेल्स सुरू राहणार आहेत. वास्तविक महापालिका क्षेत्रातील हॉटेल धारकांकडून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात कर भरला जातो. असे असतानाही शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नियमावलींमुळे महापालिका क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांना मात्र, मोठा फटका बसणार आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट आहे, ही बाब मान्य आहे. पण अडचणीत सापडलेल्या हॉटेल इंडस्ट्रीला शासनाने कर किंवा अन्य गोष्टींमधून सवलत देण्याची गरज असल्याची मागणी लहू भडेकर यांनी केली आहे.
नाईट कर्फ्यूमुळे हॉटेलकडे ग्राहक येतील तर कसे?
31 डिसेंबर हा दिवस हॉटेल व्यवसायासाठी एक पर्वणी असते. या दिवशी ग्राहकांच्या स्वागतापासून इतर गोष्टींची मोठी तयारी केली जाते. हॉटेल सजवणे, मनोरंजन अशा अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे करण्याची मानसिकता सुद्धा नाही. कारण राज्य शासनाने दहा वाजेपर्यंतच हॉटेल व्यवसायाला परवानगी दिली आहे. आता थर्टीफस्टच्या तोंडावर नाईट कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी ग्राहक हॉटेलकडे येथील अशी परिस्थिती राहिली नाही,असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.