सांगली - सांगली महापालिकेच्या असणाऱ्या"सावली बेघर निवारा" केंद्रामध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. शहरातल्या अनेक भटक्या लोकांच्यासाठी निवाऱ्याचे ठिकाण असणारे हे केंद्र आहे. तर या केंद्रातील एका निराधार व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने केंद्रातील ५८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सांगलीतील सामाजिक संघटना इन्ससाफ फाऊंडेशन व सांगली महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या एका केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातल्या आपटा पोलिस चौकीच्या मागे असणार्या महापालिकेच्या एका बंद शाळेमध्ये सावली बेघर निवारा केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामध्ये सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या व्यक्तींचा संगोपन करण्यात येते. सदर केंद्रामध्येमध्ये सध्या ५० हून अधिक बेघर असणारी वयस्कर, वृद्ध व्यक्ती राहत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून सर्वांच्या व्यवस्था करण्यात येते. यापैकी एका वयस्कर व्यक्तीला काही दिवसांपूर्वी ताप,सर्दी, खोकला आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि सदर व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
तातडीने पालिका प्रशासनाने सावली बेघर निवारा केंद्रात औषध फवारणी व इतर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. त्याच बरोबर या ठिकाणी असणाऱ्या केंद्र प्रमुख मुस्तफा मुजावर सह ५८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.