सांगली - जे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते ते आता कोठे आहेत ? आता का पळवाटा काढत आहेत, असा सवाल करत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री व सांगलीचे इच्छुक उमेदवार प्रतीक पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच हिम्मत असेल तर निवडणूक लढवावी, असे आव्हान देत स्वतःच्या भावाने त्यांना निष्क्रिय ठरवले आहे, असा टोलाही लगावला आहे.
ते आज सांगलीमध्ये बोलत होते. सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्तसंघर्ष सुरू आहे. वसंतदादा विरोधात पतंगराव कदम घराण्यातला हा संघर्ष आज उफाळून आला आहे. काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरून निशाणा साधला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असणारे आज कोठे आहेत ?, ते आता का पळवाट काढत आहेत, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली आहे.
३५ वर्ष खासदारकी ज्यांच्या घरात होती ते आता तिकीट घेण्यापासून लांब का पळत आहेत? लोकसभेचे तिकीट आपल्या घरातच राहावे, यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आम्हाला तिकीट मिळाले नाही तर दुसरे कुणालाच मिळू नये, ही भूमिका घेणे कितपत योग्य आहे. असा सवालही कदम यांनी यावेळी उपस्थित केला.
सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा कोणत्याही पक्षाला जाणार नाही. काँग्रेसकडेच ही जागा राहील, यासाठी आमचा प्रयत्न राहील. तसेच हायकमांड जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहिल, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय झाला नाही. पण खासदार राजू शेट्टीसोबत आघाडी करून ही निवडणूक लढणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.
स्वतःच्या भावाने प्रतीक यांना निष्क्रिय ठरवले -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा जिल्ह्यात कोणताही संपर्क नाही आणि त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका जाहीर केल्याचा गौप्यस्फोट विश्वजित कदम यांनी यावेळी केला. त्यामुळे स्वतःच्या भावाचा निष्क्रियता विशाल पाटील यांनी स्पष्ट केल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले आहे.
काँग्रेस कार्यालयासमोरील प्रकार हा केवळ तमाशा -
तर लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस कार्यालयासमोर आज जो प्रकार पाटील गटाकडून करण्यात आला तो तमाशा असल्याची टीका त्यांनी केली. अजून तिकीटसाठी प्रयत्न केल्यास अवघड नाही. पण ते करण्याऐवजी गप्प का बसले आहेत, असा सवालही विश्वजीत कदम यांनी केला आहे. तर विश्वजित कदम यांच्या या टिकेमुळे ऐन निवडणूकीत कदम आणि दादा गटाचा वाद आणखी चिघळणार हे नक्की .