सांगली - केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात मिरजेत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करत दुचाकी चालकांना गुलाब देऊन गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आले.
सिलेंडरला हार आणि दुचाकीधारकांना फुले
केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीवरून केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. मिरजेतील काँग्रेसच्या महिला आघाडीकडून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ होत आहे, असा आरोप करत महिला आघाडीच्यावतीने मिरजेतील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा - आमदार फंडातून सांगली रुग्णालयासाठी तीन व्हेंटिलेटर सुपूर्द
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ सुरू असून तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महिला काँग्रेसच्यावतीने गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून, तसेच दुचाकी चालकांना गुलाब पुष्प देऊन पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. नगरसेविका वाहिदा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या नेत्या शैलजा पाटील, नगरसेविका आरती वळीवडे, शुभांगी साळुंखे, नगरसेवक करण जामदार, काँग्रेस नेते अय्याज नायकवडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - ठिणगी पडून अचानक लागली गाडीला आग; भाजी विक्रेत्याचा होरपळून मृत्यू