सांगली - जत तालुक्यातील दरिबडची येथे रेशनच्या धान्याचे काळाबाजार करू पाहणाऱ्या रेशन दुकानदारास स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडले आहे. आनंदराव आप्पासो पाटील, असे दुकानदाराचे नाव असून त्याचे वाहन (क्र. एमएच. १०. बीए ७१८८) रात्री उशिरा पंचनामा करून जत तहसीलदार सचिन पाटील याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्वस्त धान्याचे दुकानदार आनंदराव आप्पासो पाटील हे आपल्या मालकीच्या टाटा सफारी वाहनामध्ये रेशनचे धान्य नेत असल्याचे गावातील काही नागरिकांच्या लक्षात आले. संशय आल्याने नागरिकांनी वाहन अडवून याबाबत अप्पर तहसीलदार यांना कळवले. घटनास्थळी आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी वाहनास संख येथे नेऊन रीतसर पंचनामा केला असता वाहनामध्ये ५० किलो वजनाचे २३ पोते धान्य आढळून आले.
याबाबत दुकानदारावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - सोशल मीडियावरील पोस्टमुळे दोघांवर खुनी हल्ला, पोलीस ठाण्यासमोरच घडला प्रकार